वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
बीड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा कार्यकाळ संपत आला असून शिल्लक कालावधीतही सरपंचांच्या हातून अधिकाधिक लोकोपयोगी कामे व्हावीत, असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले.

विकासकामांसाठी सरपंचांना जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासनाकडून सर्वोतपरी सहकार्य लाभेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केज पंचायत समिती कार्यालयात बुधवारी (दि.3) संयुक्त आढावा बैंठक, कार्यशाळा व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून अजित पवार हे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले की, आजादी का अमृत महोत्सव शासनाचा उपक्रम सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. सर्व ग्रामपंचायतीनी पुढाकार घेऊन लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षारोपण मोहीम हाती घ्यावी. नरेगामधून सार्वजनिक ठिकाणी, दुतर्फा रस्ता व गायराने अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात यावे. तसेच, दि.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करावा. या उपक्रमांतर्गत शासकीय कार्यालयांनी लावलेला राष्ट्रध्वज सूर्यास्तापूर्वी उतरावा. तसेच, घरासह खाजगी आस्थापनांनी दि.13 रोजी लावलेला ध्वज दि.15 ऑगस्ट रोजी सायंकाळी उतरावा, असे आवाहन केले. जिल्हा परिषद अंतर्गत होणार्या विकास कामांसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. यात सरपंच ते जिल्हा परिषद प्रशासनाच्या सर्व अधिकार्यांपर्यंत भ्रमणध्वनी क्रमांक, विकासकामांची स्थिती, उपलब्ध निधी अशी इत्यंभूत माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. एका क्लिकवर जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतची माहिती आता आमच्याकडे उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन गतिमान होईल. तालुक्यात नरेगाअंतर्गत अधिकाधिक कामे करावीत. सरपंच पदाचा कालावधी थोडाच शिल्लक आहे. त्यामुळे आता आपले काम झाले असे कोणीही समजू नये. पुढील निवडणुकीत पुन्हा निवडून येणार्या सरपंचांना आधीच शुभेच्छा तर नव्याने निवडून येणार्या सरपंचांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माजी सरपंचाने घ्यावी, यामुळे विकासाची प्रक्रिया गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले. यावेळी त्यांनी नरेगा, वृक्षारोपण, पाणंद रस्ते, माझा गाव-सुंदर गाव-समृद्ध गाव अभियान आदी विषयी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विजय देशमुख, कार्यकारी अभियंता श्री.चांदवडकर, यशदाचे तज्ञ मार्गदर्शक रवींद्र इंगोले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सखाराम काशीद यांनी तर सूत्रसंचलन ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी केले. केजचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांनी आभार मानले. कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष धनराज सोनवणे, सचिव ओम चोपणे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सरपंच संघटनेचे सहकार्य लाभले.
________________________
पांदण रस्ते कामात बीड जिल्हा राज्यात अव्वल
पांदण रस्ते कामात बीड जिल्हा राज्यात अव्वल आहे. सुरू असलेल्या रस्त्याची कामे गतीने पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना यावेळी श्री.पवार यांनी दिल्या.
________________________
नरेगातून होणार ईमारत बांधकाम
विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायतीला अद्यावत ईमारत नाही, अशा 14 गावांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रति ग्रामपंचायत 30 लक्ष रूपये किंमतीचे ग्रामपंचायत भवन, ईमारत बांधकाम मंजुरीचे प्रशासकीय मान्यता आदेश सरपंच, ग्रामसेवक यांना मुख्य कार्यकारी अजित पवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी 4 कोटी 20 लक्ष रूपये निधी वितरित होणार आहे. ग्रामपंचायतीची हक्काची ईमारत नसलेल्या गावच्या सरपंच, ग्रामसेवकांनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेशित केले आहे.
________________________
विविध विषयांवर अधिकार्यांकडून मार्गदर्शन
ग्रामपंचायत अभिलेखे याविषयी पाटोद्याचे गटविकास अधिकारी सुमित जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी कार्यालयीन कार्यपद्धती, गेवराईचे गटविकास अधिकारी सचिन सानप यांनी पाणंद रस्ते कार्यवाही, यशदाचे तज्ञ मार्गदर्शक रवींद्र इंगोले यांनी नरेगा कामकाज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांनी थोडेसे मायबापासाठी व रेन वॉटर हार्वेस्टिंग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे यांनी घरकुल योजना, मुख्य लेखा अधिकारी शिवप्रसाद जटाळे यांनी जीएसटी व शासकीय कपाती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांनी हरघर तिरंगा उपक्रम याविषयी उपस्थित सरपंच व कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.
________________________
राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन,कार्यालय परिसरात वृक्षारोपण
केज पंचायत समिती कार्यालयातील राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कार्यालय परिसरात करण्यात येणार्या वृक्षारोपणाचा शुभारंभ वृक्ष लागवड करून करण्यात आला.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!