केज | प्रतिनिधी
केज शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर प्रशासनाने आजपासून कारवाईला सुरुवात केली असून अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या पथकाने महामार्गालगत उभारण्यात आलेले शेड, पत्रे, फलक व इतर अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. अनेक अतिक्रमणधारकांनी प्रशासनाच्या सूचनेनंतर स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कळंब रोड परिसरातील अतिक्रमण अद्यापही जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.
केज शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कायम वाहतूक कोंडीचा विषय ठरत आहे. लॉकडाऊनच्या काळात या रस्त्याचे मजबुतीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची चर्चा त्या वेळी मोठ्या प्रमाणावर झाली होती. शहरातील नागरिकांनी अनेकदा याबाबत नाराजी व्यक्त केली होती. वाढती गर्दी, रस्त्यालगत वाढलेले अतिक्रमण आणि अव्यवस्थित पार्किंग यामुळे नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले होते.आज प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे काही व्यावसायिकांनी स्वतःच्या जागेसमोर लोखंडी शेड व पत्रे टाकून रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमण केले होते. अशा अतिक्रमणांवरही प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
मात्र कळंब रोड परिसरातील काही अतिक्रमणांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “कारवाई सर्वांवर समान झाली पाहिजे, कोणालाही अभय मिळता कामा नये,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्यात येण्याची शक्यता असून कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय प्रशासनाने निष्पक्ष कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!