बीडकरांच्या पुणे प्रवासाला मिळाली नवी कनेक्टिव्हिटी; बीड–पनवेल रेल्वेसह रेल्वे, पाणी आणि विकासाच्या प्रश्नांसाठी सोनवणे यांचा पाठपुरावा
बीड / प्रतिनिधी
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांच्या दीर्घ प्रतीक्षेतील बीड–हडपसर (पुणे) थेट रेल्वेसेवेचा बीड येथून हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या ऐतिहासिक रेल्वेसेवेमुळे बीड जिल्ह्याचा पुण्याशी थेट रेल्वे संपर्क निर्माण होत असून, विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या पुणे प्रवासाला मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. बीडच्या रेल्वे विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
पालकमंत्रीपदाच्या काळात अजितदादांनी बीडच्या रेल्वे जोडणीला दिलेले प्राधान्य आणि त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून सुरू असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे बीड–पुणे रेल्वेसेवेचा मार्ग प्रत्यक्षात आला, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड–अहिल्यानगर रेल्वेसेवेच्या शुभारंभावेळी पुणे रेल्वेसेवेबाबत देण्यात आलेला शब्द आता पूर्ण झाला आहे.
यावेळी बीड–पनवेल (मुंबई) थेट रेल्वेसेवा सुरू करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला. तसेच बीड–परळी रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर बीड जिल्हा दक्षिण भारताच्या रेल्वे नेटवर्कशी जोडला जाणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी रेल्वेबरोबरच पाणीप्रश्नाकडेही लक्ष वेधले. सोलापूर–धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अलाइनमेंट अंतिम करून प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने ५० टक्के आर्थिक सहभागाची तयारी दर्शवली असून त्यानुसार निधीची तरतूद करून प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली.
बीडच्या पाणीप्रश्नावरही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. जायकवाडीचे पाणी सिंदफणा नदीत आणणे तसेच उजनीचे पाणी मांजरा धरणात आणणे, या दोन्ही जलप्रकल्पांसाठी आवश्यक सर्वेक्षण व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ‘भारतीय रेल्वेचे महाराष्ट्र राज्याच्या विकासात योगदान’ या विषयावरील निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बीडच्या रेल्वे, पाणी आणि विकासाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. त्यामुळे बीडच्या विकासाच्या दृष्टीने रेल्वे कनेक्टिव्हिटीसोबतच सिंचन आणि नवीन रेल्वेमार्गांच्या मागण्यांनाही आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!