आपले केज

अतिक्रमणामुळे केज शहर झाले होते विद्रूप

अपघातांचे वाढले होते प्रमाण; त्यातच एचपीएम कंपनीच्या निकृष्ट कामामुळे नागरिक त्रस्त

केज | प्रतिनिधी

केज शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्याने शहराचे स्वरूप विद्रूप झाले होते. रस्त्यालगत वाढलेली अतिक्रमणे, अव्यवस्थित पार्किंग, अरुंद झालेला मार्ग आणि वाहतुकीची सततची कोंडी यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यातच एचपीएम कंपनीकडून करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे अपघातांचे प्रमाणही वाढल्याची तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र सुरुवातीपासूनच या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर तडे जाणे, उखडणे, पावसाचे पाणी साचणे अशा समस्या निर्माण झाल्या. काही ठिकाणी रस्ता उंच-सखल झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती.

दरम्यान, रस्त्यालगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा मार्ग अधिकच अरुंद झाला होता. दुकानदारांनी लोखंडी शेड, पत्रे, फलक व इतर साहित्य रस्त्याच्या हद्दीत टाकल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरली नव्हती. परिणामी किरकोळ तसेच गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले होते. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत होता.शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, वाहतूक सुरळीत व्हावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई करत रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू ठेवले.

मात्र काही भागांमध्ये अजूनही अतिक्रमणे कायम असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. “कारवाई सर्वांवर समान झाली पाहिजे. कोणालाही राजकीय किंवा आर्थिक पाठबळामुळे सूट मिळता कामा नये,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.प्रशासनाने ही मोहीम सातत्याने राबवून केज शहर अतिक्रमणमुक्त करावे आणि निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!