करोडोंचा निधी खर्चूनही दर्जाहीन काम; जनतेच्या पैशांची उधळपट्टी कोणाच्या आशीर्वादाने?
केज / प्रतिनिधी
केज शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र, या निधीतून होणाऱ्या विकासकामांचा दर्जा पाहता ‘विकास’ाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची अक्षरशः उधळपट्टी सुरू आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.केज शहरातील कानडी माळी रोड ते मानमोडी शिवारापर्यंत रस्ता मजबुतीकरण, सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला. हे काम यश कन्स्ट्रक्शन या कंत्राटदारामार्फत करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच रस्त्याला तडे व भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, केज शहरातील पारस हॉटेलसमोरील पुलाचे काम तर अवघ्या ४८ तासांतच उघडे पडले. नव्याने करण्यात आलेल्या पुलाच्या स्लॅबला भगदाड पडल्याने संबंधित कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामात असा निकृष्टपणा होत असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली होती तरी कधी? कामाचा दर्जा तपासला होता तरी कसा? आणि ठेकेदाराला देयके अदा करण्यापूर्वी गुणवत्ता तपासणी झाली होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
बातमी झळकताच ‘झोपेचे सोंग’ उतरले!नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही संबंधित यंत्रणा किती दिवस गप्प बसणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, वृत्तपत्रांनी या भगदाडाच्या कामाचा पर्दाफाश करताच संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची लगबग सुरू झाली. पुलाची डागडुजी करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.यामुळे नागरिकांमध्ये आणखी संताप व्यक्त होत असून, बातमी प्रसिद्ध होण्यापूर्वी कामाच्या गुणवत्तेची आठवण का झाली नाही? असा सवाल केला जात आहे. काम निकृष्ट असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच डागडुजी सुरू करायची आणि त्यानंतर सर्व काही सुरळीत असल्याचा आव आणायचा, हा प्रकार नेमका कोणाच्या हितासाठी? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
‘डागडुजी’ने भ्रष्टाचार झाकला जाणार का? नव्याने बांधलेल्या पुलाला ४८ तासांत भगदाड पडणे ही साधी बाब नसून संपूर्ण कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची गरज आहे. केवळ भगदाड बुजवून किंवा डागडुजी करून प्रकरणावर पडदा टाकण्याऐवजी संबंधित कामाची तांत्रिक तपासणी, वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता, काँक्रिटची ताकद, कामाची मोजमापे आणि कंत्राटदाराला करण्यात आलेली देयके यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.जनतेच्या कराच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांना ‘थातूरमातूर’ कामांची जोड देऊन कोणाची तिजोरी भरली जात आहे? असा संतप्त सवाल आता केजकर विचारत आहेत. संबंधित विभागाने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी कंत्राटदारावर तसेच कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.पूल ४८ तासांत उघडला; आता चौकशीचे कुलूप कधी उघडणार? याकडे केजकरांचे लक्ष लागले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!