कॉपीबाजांवर अजामीनपात्र कारवाई
बीड । प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपी करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही असा कडक इशारा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला आहे. कॉपीमुक्त अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाने अत्यंत कठोर आणि धडकी भरवणारी यंत्रणा उभी केली असून यंदा परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार करणे अशक्यप्राय ठरणार आहे.जिल्ह्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून संवेदनशील केंद्रांवर आवाज रेकॉर्डिंगसह सीसीटीव्ही कार्यान्वित राहणार आहेत. या सर्व यंत्रणेवर जिल्हास्तरीय कंट्रोल रूममधून थेट नजर ठेवली जाणार आहे. संशयास्पद हालचाल आढळताच तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्यात येणार असून महत्त्वाच्या विषयांच्या दिवशी भरारी पथक व बैठे पथकांकडून अचानक तपासण्या केल्या जाणार आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने परीक्षा केंद्र परिसरावर सतत नजर ठेवली जाणार आहे.
परीक्षा केंद्रावर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. अनधिकृत व्यक्तींना केंद्र परिसरात प्रवेश करण्यास सक्त मनाई असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रापासून पाचशे मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स परीक्षा कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
कॉपी प्रकरणात विद्यार्थी शिक्षक किंवा बाहेरील व्यक्ती कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असून जामीन मिळणे कठीण होणार आहे. प्रशासन कोणावरही दया दाखवणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी परीक्षांचा पारदर्शकपणा टिकून राहावा आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहावा यासाठी कॉपीमुक्त अभियान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले. पालक शिक्षक अधिकारी आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!