आपले केजशिक्षण

आदर्श जिल्हा परिषद शाळा पुढारी संस्थासम्राट व भूमाफियांच्या तावडीतून अखेर वाचली !

माजी विद्यार्थ्यांच्या एकजुटीने प्रजासत्ताक दिनी शाळेला दिले नवे जीवन

केज । प्रतिनिधी

केज तालुक्यातील एकेकाळची आदर्श जिल्हा परिषद शाळा आज दयनीय अवस्थेत पोहोचल्याचे चित्र समोर आले आहे. या शाळेने अनेक दशकांपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देत, संस्कारक्षम व जबाबदार नागरिक घडविण्यात या शाळेचा मोठा वाटा राहिला आहे. आजही या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असून भारताच्या विकासात योगदान देत आहेत. अशी गौरवशाली परंपरा असलेली शाळा हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर गेली. इमारतीची अवस्था खालावली, विद्यार्थी संख्या घटली आणि प्रशासनाकडूनही अपेक्षित लक्ष मिळाले नाही. विशेष म्हणजे केज शहरात मोठ्या प्रमाणावर मातब्बर पुढारी असतानाही त्यांनी या शाळेकडे ढुंकूनही पाहिले नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.यामागील कारणही आता स्पष्ट होत आहे. केज शहरात अनेक खासगी शिक्षण संस्था चालविणारे तथाकथित “शिक्षण सम्राट” आपापल्या संस्था फोफावण्यासाठीच प्रयत्नशील राहिले. शासकीय जिल्हा परिषद शाळा मजबूत झाल्यास खासगी संस्थांना विद्यार्थी मिळणार नाहीत, या भीतीने या आदर्श शाळेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर शाळेचे मोठे क्षेत्रफळ लक्षात घेता, शहरातील भूमाफियांची नजरही या मौल्यवान जागेवर होती, अशीही गंभीर आरोपांची चर्चा सुरू आहे.मात्र या सर्व परिस्थितीत आशेचा किरण ठरले ते या शाळेचे माजी विद्यार्थी. शाळेची अवस्था पाहून मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी एकत्र आले. “ज्या शाळेने आम्हाला घडवले, त्या शाळेसाठी आता आम्ही काहीतरी करायलाच हवे,” या भावनेतून त्यांनी पुढाकार घेतला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत, शाळेच्या स्वच्छतेपासून ते इमारतीच्या दुरुस्तीपर्यंत विविध उपक्रम राबवून शाळेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.या उपक्रमामुळे प्रशासनाचेही लक्ष या शाळेकडे वेधले गेले. अनेक वर्षांच्या दुर्लक्षानंतर प्रशासन हालचालीत आले असून, शाळेच्या पुनर्विकासाबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या एकजुटीमुळे शिक्षण सम्राट व भूमाफियांना चांगलीच चपराक बसल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे.

आज केज शहरात या माजी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. “ही केवळ एका शाळेची लढाई नाही, तर सार्वजनिक शिक्षण वाचविण्याची चळवळ आहे,” असे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत. आता प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाज यांनी एकत्र येऊन या आदर्श जिल्हा परिषद शाळेला पुन्हा पूर्ववैभव प्राप्त करून द्यावे, अशी जोरदार मागणी केजकर नागरिकांतून होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!