आपला बीड जिल्हाक्राईम
चिंचोलीमाळी येथील थरारक खून प्रकरणातील खुन्यावर पोलीसांची झडप ! एक आरोपी पोलीसांच्या जाळ्यात !
रेखाचित्रा अधारे केज पोलिसांनी लावला खुनातील आरोपीचा शोध !

पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या पथकाचे यश !
वादळ वार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील खळबळ माजविणाऱ्या खून प्रकरणी कोणताही पुरावा मागे न ठेवता पसार झालेल्या मारेकऱ्यांचा रेखाचित्रा आधारे तपास करून केज पोलीसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

(मयत पांडुरंग राऊत )
या बाबतची अधिक माहिती अशी की दि. ११ जुलै सोमवार रोजी केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे सायंकाळी सुमारे ७:०० वा. च्या दरम्यान गावा पासून एक कि. मी. अंतरावर वरपगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्री. क्षेत्र रामकृष्ण महाराज संस्थांनच्या कमानी जवळ शेतातील पत्र्याच्या शेडवजा घर असलेल्या पांडुरंग राऊत यांच्या घरी तोंडाला कपडा बांधलेले अनोळखी व्यक्ती गेले. त्यांनी राऊत यांच्या पत्नीला पिण्यासाठी पाणी मागितले. राऊत यांची पत्नी शशिकला राऊत ही पाणी घेऊन येताच त्या तीन अज्ञात चोरट्यानी तिच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. या वेळी शशिकला मोठ्याने ओरडली म्हणून तिचा नवरा पांडुरंग राऊत पळत आला. आणि त्याची चोरट्याबरोबर झटापट झाली. त्यामुळे चिडलेल्या अज्ञात चोरट्यांनी पांडुरंग राऊत यांच्यवर चाकू हल्ला केला. चाकुचा वार एवढा जोरदार होता की, छातीच्या खाली मारलेला चाकू पाठी मागील बाजूने आरपार निघाला. या झटापटीत राऊत यांची पत्नी शशिकला राऊत ही देखील जखमी झाली आहे. मारेकऱ्यांनी खून करून पळून जाताना कोणाला दिसू नये आणि ओळख पटू नये म्हणून घराच्या समोर लावलेला विजेचा बल्ब काढून अंधार करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. 
तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे
चाकूचा घाव वर्मी बसताच पांडुरंग राऊत हे जमीनिवर पडले. त्यांचा अती रक्त स्त्रावाने जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. हल्ल्या नंतर ते मारेकरी दुचाकी वरून वरपगाव रोडने पसार झाले होते.
या घटनेने जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली होती. मयत पांडुरंग यांची जखमी पत्नी शशिकला राऊत हिच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात दि. १२ जुलै मंगळवार रोजी अज्ञात मारेकऱ्या विरुद्ध गु. र. नं .२८८/२०२२ भा. दं. वि. ३०२, ३०७, ३९४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील
या प्रकरणी पोलीस सर्व बाजूनी तपास करीत होते. परंतु काही पुरावा हाती लागत नव्हता. मग गंभीर गुन्ह्याच्या तपासात हातखंडा तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्याशी चर्चा करून एका आर्टिस्टकडून फिर्यादीने दिलेल्या माहिती आधारे रेखाचित्र तयार केले. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम यंत्रणा याचा आधार घेत उस्मानाबाद जिल्ह्यातील इटकुर ता. कळंब येथील बोगा पारधी वस्तीवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
त्या नंतर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्या पथकातील अनिल मंदे, अशोक नामदास, दिलीप गित्ते, महादेव बहिरवाळ, बाळासाहेब अहंकारे, राजू गुंजाळ यांच्या पथकाने राजेंद्र उर्फ शाम मोहन शिंदे याला कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खुनातील आरोपीवर झडप घालून ताब्यात घेतले. आरोपी राजेंद्र उर्फ शाम शिंदे याला केज पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला असता या खुनात तो मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी राजेंद्र उर्फ शाम शिंदे याला न्यायालया समोर हजर केले असता त्याला दि. २२ जुलै पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
____________________________________________



