आंदोलनआपले केज

माता रमाई बौद्ध विहाराच्या जागेप्रश्नी प्रशासनाची तात्काळ दखल; नगरपंचायतीचा प्रस्ताव तहसीलदारांकडे रवाना!

दिपक कांबळे यांचा पाठपुरावा सुरूच; ३० नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

केज / प्रतिनिधी

केज शहरातील केज-बीड महामार्गालगत गट क्रमांक ३०/२ मधील गायरान जमिनीपैकी २० गुंठे जागा माता रमाई बौद्ध विहारासाठी आरक्षित करून मिळावी, या मागणीला आता प्रशासकीय स्तरावर हालचाल सुरू झाली आहे. दलित नेते तथा माता रमाई बौद्ध विहार कृती समितीचे दिपक कांबळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची नगरपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेत संबंधित जागा आरक्षित करण्याबाबतचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार, केज यांच्याकडे पाठविला आहे.यासंदर्भात दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी दिपक कांबळे, अजय भांगे, दिलीप बनसोडे यांच्यासह अन्य बौद्ध अनुयायांनी नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. केज-बीड महामार्गावरील गट क्रमांक ३०/२ मधील २० गुंठे गायरान जागा माता रमाई बौद्ध विहारासाठी आरक्षित करून देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली होती.संबंधित जागेवर अनेक वर्षांपासून तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली असून, दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या जागेला बौद्ध समाजाच्या धार्मिक व सामाजिक जीवनात विशेष महत्त्व आहे. मात्र, अनेक वर्षांपासून जागेचा प्रश्न प्रलंबित असल्याने समाजामध्ये नाराजी व्यक्त केली जात होती.

या मागणीसंदर्भात नगरपंचायत कार्यालयाने दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पत्र काढून गायरान जमिनीचे आरक्षण निश्चित करणे, वर्ग बदलणे अथवा सार्वजनिक प्रयोजनासाठी जागा हस्तांतरित करण्याचे अधिकार महसूल विभागाच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार गट क्रमांक ३०/२ मधील २० गुंठे जागा माता रमाई बौद्ध विहारासाठी आरक्षित व मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव तहसीलदार, केज यांच्याकडे पुढील योग्य कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास दि. ३० नोव्हेंबर २०२६ पासून आमरण उपोषण, साखळी उपोषण तसेच रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन प्रस्ताव पुढे पाठविल्याने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

मात्र, प्रस्ताव पाठविणे म्हणजे जागा प्रत्यक्ष आरक्षित झाल्याचा अंतिम निर्णय नसून, आता महसूल विभागाच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माता रमाई बौद्ध विहाराच्या जागेचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत दिपक कांबळे यांचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!