आपला बीड जिल्हाआपले केजभ्रष्टाचार
केज नगरपंचायतने जलशुद्धी करणाच्या दुरुस्तीसाठी तब्बल २१ लक्ष रुपये खर्च करून देखील अशुद्ध पाणीपुरवठा केज, धारूर सह १२ गावातील नागरीकांच्या दारी
केज नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वादळवार्ता – केज
निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यामध्ये अनेक पदार्थ मिसळले जातात, उदा. जमिनीवर पोहोचण्यापूर्वी पावसाच्या पाण्यामध्ये हवेतील धूलिकण, जीवाणू, पराग आणि कार्बन डाय-ऑक्साइड व ऑक्सिजन ह्यांसारखे वायू मिसळतात. जमिनीवरून पाणी वाहत असताना तिच्यावर असणारे पदार्थ पाण्याबरोबर वाहत जातात. थोडक्यात, पाण्याचा कोणताही वापर करण्यापूर्वी त्याच्यामध्ये अनेक पदार्थ मिसळतात ,असे प्रदूषित पाणी शुद्ध केल्याशिवाय कोणत्याच कामासाठी वापरता येत नाही. जर वापरले तर मात्र आरोग्य धोक्यात आले म्हणुन समजा.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि केज , धारूर सह १२ गावाना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी सोनिजवळा येथे जल शुद्धीकरण प्रकल्प कोट्यावधी रुपये खर्च करूण तयार करण्यात आला.

त्याचा हेतु म्हणजे घरगुती वापरासाठी पाणी रंगहीन, वासहीन, चांगल्या चवीचे आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित असले पाहिजे हाच होय परंतु मागील दिड वर्षापासुन हा जलशुद्धी प्रकल्प आजारी पडला असल्यामुळे केज नगर पंचायतीने केज धारुरसह १२ गावाना शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या सोनीजवळा फाटा येथील १०.७० MLD जलशुद्धीकरण केंद्राच्या ३५० मी.मी. व १०० मी.मी. व्यासाचे सुलुस व्हॉल्व, बॅक वॉश टँकच्या ३५० मी.मी. व्यासाच्या MS पाईपचे लिकेज दुरुस्ती करून वाळू बदलण्यासाठी सदरील प्रकल्पावर तब्बल २१ लक्ष ४८ हजार रुपये खर्च केले.

परंतु सदरील काम करणाऱ्या गुत्तेदार यांने फक्त गाळ काढून पाढरी रेती टाकली असुन कराराप्रमाणे काम न केल्यामुळे आज देखील केज ,धारूर सह १२ गावाना अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. याला जबाबदार कोण केज नगरपंचायत कि गुत्तेदार ? सहाजिकच आहे काम पारदर्शक केले असते तर अशुद्ध पाणीपुरवठा झाला नसता. तरी देखील काम केले कि नाही ? का वरवरचे काम करून कागदोपत्री निधी उचलला गेला ? असे अनेक प्रश्न अशुद्ध पाणी वापरणाऱ्या केज- धारूर सह १२ गावातील नागरीकांना पडले आहेत.

आज २० दिवसांनी नळाद्वारे सुटणार्या पाण्याचा वास येतो ते अस्वच्छ असते. केजचे सत्ताधारी वा मुख्याधिकारी AC मध्ये बसुन बिस्लरीचा वापर करतात . मात्र जनतेच्या आरोग्याशी खेळताना दिसुन येत आहे . मात्र अशुद्ध पाण्यामुळे केज – धारूरसह १२ गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जलशुद्धीकरण प्रकल्प दुरुस्ती मी येण्या अगोदर झाली असल्यामुळे याबद्दल मला माहिती नाही परंतु चौकशी केली जाईल .
महेश गायकवाड मुख्याधिकारी नगरपंचायत केज
_______________
जल शुद्धीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे केज शहराला पाणीपुरवठा अशुद्ध होत आहे . आबड धोबड कामे करुण बिले उचलली गेली.
भाउसाहेब गुंड (गटनेते ) नगरपंचायत केज
_______________
जलशुद्धीकरण प्रकल्प दुरुस्ती केव्हां झाली माहित नाही , परंतु केज शहराला पाणीपुरवठा अशुद्ध होत असल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आहे.
अजहर इनामदार (सभापती) पाणीपुरवठा विभाग न.प. केज
______________
जे फिल्टर बेड ८ ते १५ दिवसातुन एकदा स्वच्छ करावी लागतात तब्बल एक वर्षापासुन तशीच आहेत. फिल्टरचे ४ बेड स्वच्छ करण्यासाठी केज नगरपंचायतला सांगुन सांगुन थकलो परंतु आद्यापर्यंत माणसं दिली गेली नाहीत.
रामा कोडिंबा राऊत (कर्मचारी )जि.प. बीड



