दरवाजाचे कुलूप तोडून अडीच लाखाचे दागिने पळविले
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी भरदिवसा घरात कोणी नसल्याची संधी साधून केज येथील शाहु नगर भागातील एका जलसंधारण अधिकाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने अडीच लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले.
या बाबतची माहीती अशी की, केज येथील जलसंधारण विभागाचे जलसंधारण अधिकारी कमलाकर अच्युतराव ढाकणे आणि ढाकेफळ येथे सहाशिका असलेली त्यांची पत्नी क्रांती हे केज येथील शाहूनगरमध्ये राहतात. दि. १७ सप्टेंबर रोजी जलसंधारण अधीकारी कमलाकर ढाकणे हे त्यांच्या पत्नी सोबत सकाळी १०:३० वा. वाघेबाभळगाव ता. केज येथील शेतात गेले होते. त्यांचा मुलगा किशोर ढाकणे हा घरीच थांबला होता. त्या नंतर काही वेळाने किशोर ढाकणे हा घराला कुलूप लावून त्याचा मित्र वैभव मोराळे याच्या सोबत चिंचपूरच्या मारुतीच्या दर्शनाला गेला. किशोर ढाकणे हा ४:१५ वा. च्या दरम्यान घरी आला असता त्याला घराचे कुलूप तोडून आतील सामान इतस्ततः विखुरले असल्याचे आढळून आले. त्याने ही माहिती फोन वरून त्याचे वडील कमलाकर ढाकणे यांना दिली. कमलाकर ढाकणे यांनी घरातील लाकडी फर्निचरच्या कपाटात डब्बीत ठेवले सोन्याचे दागिने बघायला सांगितले. किशोर याने कपाटात पाहिले असता डब्बीतील सोन्याचे पट्टी गंठण, सोन्याचे मनीगंठण, सोन्याचे कानातील टॉप्स व फुले, सोन्याचे कानातील सरपाळे असे एकूण सव्वा पंधरा ग्रॅम वजनाचे ज्याची किंमत २ लाख ५० हजार रु. आहे; त्या दागिन्यांची चोरी झाली.
या प्रकरणी जलसंधारण अधिकारी कमलाकर ढाकणे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र .नं. ४१७/२०२२ भा. दं. वि. ३८० आणि ४५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घरफोडीचा तपास सूरु आहे.