राज्य

तिरडीवरच्या तरुणाचा मृत्यु झालाच नव्हता ; ढोंगी बाबाची प्रसिद्धीसाठी तरुणाच्या मरणाची बनवाबनवी

 

अकोला : ‘अकोल्यातील एका घरावर संकट कोसळलं. घरातील तरुण मुलाचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. तिरडी बांधली. त्याचा देह तिरडीवर ठेवला. आणि उचलून स्मशानात नेत असतानाच तो मृत तरुण हलू लागला. लोकांनी तिरडी स्मशानाऐवजी मंदिरात नेली. तिथे एका बाबाने मंत्रोच्चार करून त्या तरुणाला जिवंत केले’, या बातमीने ऐन दिवाळीत अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, या प्रकारातील बोगसपणा एका ठाणेदाराच्या जागरूकपणामुळे उघड झाला आहे. प्रत्यक्षात तो तरुण दगावलेला नव्हताच. हे सगळे कांड एका बाबाने स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी घडवून आणले होते, असे आता स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी ‘त्या’ बंडलबाज बाबाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
२६ ऑक्टोबर रोजी विवरा येथे प्रशांत रामकृष्ण मेसरे हा तरुण मरण पावला. त्याला तिरडीवरून स्मशानात घेऊन जात असतानाच त्याने हालचाल केली. त्यामुळे एका बाबाच्या सांगण्यावरून तिरडी संस्थानात न नेता जवळच्या मंदिरात नेण्यात आल्याची आणि तेथे तो तरुण तिरडीहून उठून बसल्याची माहिती चान्नी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे यांना मिळाली होती. तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली . स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय दैनिके आणि वृत्तवाहिन्यांनी त्याची दखल घेतली. त्यामुळे सर्वत्र या बातमीची चर्चा सुरु झाली होती.

बाबाच्या सांगण्यावरून रचला मरणाचा खेळ

वाघमारे यांनी यांनी या प्रकरणाच्या खोलात जायचे ठरवल्यावर तपासात वेगळीच कहाणी समोर आली. प्रशांतला तिरडीवरून घेऊन जाताना अंत्ययात्रा गावाच्या वेशीवर आली असता तंत्र मंत्र करणारा बाबा दीपक उर्फ सागर गणेश बोरले याने प्रशांतचा भाऊ गोपाल मेसरे याला बाजूला घेऊन ‘प्रशांतला जवळच्या मंदिरात घेऊन चला, मी त्याला जिवंत करतो’ असा दावा केला. त्यानुसार गोपालसह नातेवाईक प्रशांतला मंदिरात घेऊन गेले. तेथे प्रशांतकला जिवंत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती वाघमारे यांना मिळाली होती. ते सहकारी पोलिसांना घेऊन त्या मंदिरात पोहोचले. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमा झाली होती. पोलीस पोहोचेपर्यंत तांत्रिक बाबा दीपकने प्रक्रिया पूर्ण करून प्रशांतला जिवंत केले होते, अशी माहिती वाघमारे यांना मिळाली. त्यांनी खोलात जायचे ठरवून त्या ठिकाणची पाहणी केली असता त्यांना त्रिशूल, कापूरडबी, मोरपिस, पूजेचे सामान, आरतीचे ताट, हळदी कुंकू, पंचपाळे, कवड्याची माळ आदी साहित्य आढळले. योगेश वाघमारे यांनी त्यावर न थांबता प्रशांतला चतारी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेवून त्याची वैद्यकीय तपासणी केली. तेथे खऱ्या अर्थाने सत्य बाहेर आले. प्रत्यक्षात प्रशांत मृत पावलेलाच नव्हता. त्याची प्रकृती ठणठणीत आहे, अशी माहिती समोर आली.
तांत्रिक बाबा दीपकने प्रशांत मरण पावलेला नसताना लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत त्याला मरणाचे नाटक करण्यास सांगितले होते. त्यानंतर प्रशांतने तिरडीवर हालचाल करायची, मग आपण त्याला जिवंत केल्याचे दाखवू, असा खेळ ठरला होता. घडलेही तसे. या घडल्या प्रकाराची बातमी पण झाली. त्याची चर्चा भरपूर झाली. परंतु, नंतर सहायक पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे यांच्या जागरुकपणामुळे हा सगळा खेळ उद्ध्वस्त झाला.

आता पोलिसांनी दीपक उर्फ सागर गणेश बोरले याच्या विरोधात भादंवि कलम ५०५ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत सहकलम ३ अनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी फिर्याद दाखल केली.
दरम्यान, लोकांनी अशा अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश वाघमारे यांच्यासह अकोला पोलिसांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!