वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्याचा केज पोलिसांनी यशस्वी तपास करून मुद्देमाल ह्दतगत केला आणि तो मुद्देमाल मालकांच्या ताब्यात दिला.

या बाबतची माहिती अशी की, गुरुवार दि. २९ सप्टेंबर रोजी केज शहरातील क्रांती नगर भागात राहत असलेल्या सुरेखा श्रीराम दांगट आणि त्यांचे नातेवाईक सुनिता मधुकर मोरे, द्वारका बाबुराव मोरे या सकाळी ११:०० वा. च्या सुमारास धारूर तालुक्यातील अंबाचौंडी देवीचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या. त्या केज शहरातील बसस्थानकातून धारूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना; गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सुरेखा दांगट यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किंमतीचे १६ ग्रॅमचे सोन्याचे मिनीगंठण तोडून घेत पोबारा केला होता.
केज पोलिसांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार श्रीकांत चौधरी यांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास केला असता तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दोन महिलांची हालचाली संशयास्पद असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला.
चोरी केल्या नंतर त्या दोघी येरमाळ्याला गेल्या आणि त्या नंतर दि. ३० सप्टेंबर रोजी परत बीडकडे जाण्यासाठी केज येथे आल्या असल्याची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी सापळा लावला आणि मंगल सतीश तुसांबर, रा. पेठ बीड आणि केशरबाई सुखदेव जाधव रा. नाळवंडी नाका, बीड त्या दोघी बस स्टॅंड जवळील हॉटेल बसंत बिहार समोर दोघींना ताब्यात घेतले. तपासी अधिकारी पोलीस जमादार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कडून चोरलेले गंठन हस्तगत केले होते.
तसेच अन्य एका प्रकरणी २१ सप्टेंबर रोजी धर्माळा ता. केज येथील शेतकरी दिनकर सखाराम गोडसे यांनी त्यांच्या शेतातील कोबीचे पीक विकल्या नंतर आलेली रक्कम घेऊन ते त्यातून दुकानदारांची उधारी देण्यासाठी जात असताना; रस्त्यात पाऊस येत असताना थांबले होते. त्यांच्या एका हातात बाजाराची पिशवी व बगलेत पैसे आणि मोबाईल ठेवलेली बॅग होती. त्या दरम्यान कानडी रोड केज जवळच्या जुन्या सरकारी दवाखान्याच्या रस्त्यावर त्यांना दशरथ पवार याने बोलण्याचा बहाणा करून तांबविले. तर मागून अरूण काळे याने धक्का मारून धारदार वस्तूने बगलेतील बॅग कापून त्यातील ४९ हजार ५०० रु आणि दोन मोबाईल लांबविले होते.
या प्रकरणी तपासी अधिकारी श्रीकांत चौधरी यांनी तपास करून दशरथ पवार व अरुण काळे याला ताब्यात घेऊन त्यांच्या कडून रोख रक्कम व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केले होता.
दरम्यान दि. १ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सुरेखा दांगट आणि दिनकर गोडसे याना केज पोलीस ठाण्यात बोलावून गंठण आणि रोख रक्कम व मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला. या वेळी पोलिस जमादार राम यादव, पोलिस नाईक तांदळेआणि पंच उपस्थित होते.