केज/प्रतिनिधी
देशाच्या साठ वर्षाच्या इतिहासातील काँग्रेसच्या कार्यकाळात आखलेल्या चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे देशाचा आर्थिक विकास खुंटला असा घनघाती आरोप केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केला.महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे.या निवडणुकीत कुण्या उमेदवाराचं भविष्य ठरणार नसून आपण योग्य उमेदवाराला निवडून दिला तर संपूर्ण महाराष्ट्राचे भविष्य ठरणार आहे असे उद्गार केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी काढले.केज मतदार संघातील भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ झालेल्या विराट जाहीर सभेत गडकरी बोलत होते.मंचावरआ.पंकजाताई मुंडे,माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, आ.नमिताताई मुंदडा,ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा,युवा नेते अक्षय मुंदडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना गडकरी जी पुढे म्हणाले की,देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली.त्यात साठ वर्ष काँग्रेसला राज्य करण्याची संधी मिळाली.ग्राम पंचायत पासून केंद्रीय पातळीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता.परंतु देशातील गरिबी हटलीच नाही.गरिबी हटली ती फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची.काँग्रेसने देशाच्या इतिहासात साठ वर्षात आखलेले चुकीचेआर्थिक धोरण आणि भ्रष्ट प्रशासनामुळे देशाचा विनाश झाला.चुकीचे आर्थिक नियोजन केल्यामुळे जनतेचे परिणामी देशाचे खूप मोठे नुकसान झाले.नेहरूंनी रशियाच्या धर्तीवर आखलेले देशाचे विकास धोरण म्हणावे तसे यशस्वी ठरले नाही त्याचे दुष्परिणाम आमच्या देशावर झाले. काँग्रेसच्या काळात नुसती आश्वासनेच दिली गेली ती पूर्णत्वाला गेली नाही. केंद्रात आपली सत्ता आल्यानंतर बीड जिल्ह्यात आपण दहा हजार कोटी रुपयांची कामे केली.भारतात पैशाची कमी नाहीये परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कमतरता आहे असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले की, साठ वर्षात काँग्रेसने जी कामे केली नाहीत ती मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही दहा वर्षात करून दाखवली.मुंबईत ५५ उड्डाण पूल बांधले,वरळी बांद्रा सी लिंक बांधला.मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला यासाठी जनतेतून पैसा उभे केले. सरकारचा पैसा महाराष्ट्रातील सोळा हजार गावांमधील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत बांधण्यात आले यासाठी कुठलाही निधी कमी पडू दिला नाही.बाजपेयी सरकारच्या काळात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत देशातील रस्त्यांचे जाळे विणले.देशातील साडेसहा लाख गावांपैकी साडेतीन लाख गावांमधून रस्ते बांधण्याचे काम आमच्या सरकारच्या काळात झाले आहे.सिंचन क्षेत्रात सुद्धा खूप मोठी कामे मोदी सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास जात आहेत. काँग्रेसच्या काळात आरोग्य,शिक्षण,सिंचन,शेती,विज या क्षेत्राकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही परिणामी देशाचा विकास खुंटल्या गेला.आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात सिंचन क्षेत्राकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन ते पूर्णत्वाला नेले. यासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही.या देशात पाण्याची कमतरता नसून त्याच्या नियोजनाची कमतरता आहे,यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना राबवणे आवश्यक आहे.धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा,चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा थांबणाऱ्या पाण्याला प्यायला लावा असे मत व्यक्त करुन ते पुढे म्हणाले की आमच्या देशातील शेतकरी हा आता अन्नदाता राहणार नाही तर ऊर्जादाता म्हणून उदयाला येणार आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले इथेनॉलवर देशातील वाहने चालणार आहेत.देशातील शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे यासाठी योग्य धोरणाची आवश्यकता आहे.युती शासनाने जात धर्म पंथ असा भेदभाव न करता जनविकासाची कामे केली,महाराष्ट्र सरकारच्या एकूण ६८ योजना आहेत ज्यात हिंदू-मुस्लिम असा कुठलाही भेदभाव आम्ही करत नाहीत.सबका साथ,सबका विश्वास,सबका विकास हे धोरण समोर ठेवून कार्य करत आहे.या समाजात मानवता प्रस्थापित करायची असेल तर जात पंथ धर्म विरहित समाज व्यवस्था निर्माण केली पाहिजे,आत्मनिर्भर भारत बनवणे हे आपले स्वप्न आहे.विश्वगुरू बनवणे हे आपले स्वप्न आहे, जगातील तिसरी अर्थव्यवस्था निर्माण होण्या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याच्या पूर्णत्वा साठी आपण कार्य केले पाहिजे,राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर सुशासन असणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले.लोकसभा निवडणुकी दरम्यान देशाचे संविधान बदलणार असा अपप्रचार केला व काँग्रेसने जातीयवादाचे विष समाजात पेरले असे मत शेवटी त्यांनी व्यक्त केले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!