आपला बीड जिल्हा
मनोज जरांगेंच्या काळजीपोटी खा.बजरंग सोनवणे थेट अंतरवाली सराटीत
राज्य सरकारला दया, माया उरली नाही
बीड/प्रतिनिधी
मराठा समाजाचं भलं व्हावं यासाठी स्वतःच्या जिवाची परवा न करता, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, अंतरवाली सराटीत आमरण उपोषणास बसले आहेत.त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने उपोषण सोडवावे अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी पत्र पाठवून केली होती. त्यानंतर बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी रविवार (दि.22) रोजी अंतरवाली सराटीत जावून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली. राज्य सरकारने एवढे निर्दयी वागू नये, गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. मात्र अद्यापही त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी हालचाली केलेल्या नाहीत. सदरील बाब चिंतेची असून गंभीर आहे. त्यामुळे मराठा समाज योग्यवेळी योग्य जागा दाखवून देईल,असा रोष राज्य सरकारच्या विरोधात खा. बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, 17 तारखेपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणास बसले आहेत. राज्य सरकारने आतपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविणे आवश्यक होते.मात्र तशा कोणत्याही हालचाली केल्याचे दिसून येत नाही.याउलट अंतरवाली सराटीत येणाऱ्या मराठा मावळ्यांना प्रशासनाकडून अडविण्याचा प्रयत्न झाला.भारतीय संविधान सगळ्यांना समान अधिकार देते, एखादा व्यक्ती अथवा समाज त्यांच्या संविधानिक मागण्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण, आंदोलन करत असेल तर त्यांना अडविणे कितपत योग्य आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवावा तेवढा कमीच आहे. कारण एक साधा माणूस मराठा समाजाला त्यांचे संविधानिक हक्क मिळवून देण्यासाठी जीवाची परवा न करता खंबीरपणे लढतो आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारकडून केवळ आणि केवळ आश्वासने देण्यात आली आहेत, ठोस असा निर्णय घेतलेला नाही.परिणामी मराठा समाजाच्या आंदोलनाची धग आजही तेवढीच आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी पावले असे खा.बजरंग सोनवणे म्हणाले.यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेताना ते असेही म्हणाले की पाटील राज्यातील कोटी मराठा समाज तुमच्या एका आवाजाने शांततेत पेटून उठतो. तुम्ही मराठा समाजाच्या पिढ्यांसाठी स्वतःचा जीव झिजवीत आहात, त्यामुळे अंतरवाली सराटीत येणाऱ्या मावळ्यांवर स्थानिक प्रशासनाकडून जर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही.असा सजग इशारा खा. बजरंग सोनवणे यांनी दिला.
राज्य सरकारवर सडकून टिका
खा.बजरंग सोनवणे यांनी रविवारी आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आसूड ओढला, खा.बजरंग सोनवणे म्हणले की, सरकार जनतेच्या हिताचे असावे लागते, मात्र सध्याचे सरकार जनतेच्या हिताचे नसून स्व:हीताचे आहे.कारण समाजाचे प्रश्न मार्गी लागत नसतील तर असले सरकार घरी बसविणे योग्य राहते. असे म्हणत राज्य सरकारवर खा. बजरंग सोनवणे यांनी सडकून टीका केली.