Uncategorized

केज नगरपंचायत मूलभूत सुविधा पुरविण्यात सपशेल अपयशी

केजच्या विस्तारलेल्या भागात नळ योजना, रस्ते, नाल्यांचा प्रश्न बिकट

वादळवार्ता – केज 

केज शहराची लोकसंख्या ३० हजाराहून अधिक वाढली असून शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. विस्तारलेल्या भागापर्यंत अद्याप ही नळ योजना पोहचली नसून रस्ते, नाल्यांचा प्रश्न बिकट बनला आहे. नगरपंचायत ही मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असून शहराच्या विकासासाठी नगर परिषदेचा दर्जा मिळणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

      केज शहराची लोकसंख्या ही ३० हजाराहून अधिक झाली आहे. तर शहराचा विस्तार बीड, धारूर, कळंब आणि अंबाजोगाई रस्त्यालगत वाढत चालला आहे. लोकसंख्येची वाढीनुसार  विस्तार झालेल्या भागात मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. त्यादृष्टीने नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र आवश्यक असलेल्या भागात रस्त्याची कामे होत नसल्याने विस्तारलेल्या भागातील नागरिक हे रस्ते, नाल्यांच्या सुविधेपासून वंचित राहिले आहेत. धनेगाव धरणातून केज शहराला पाणी पुरवठा योजना सुरू असून विस्तारलेल्या भागापर्यंत ही नळ योजना नेली जात नसल्याने नागरिकांना बोअरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. विस्तारलेल्या भागातील नागरिक नगरपंचायतीला कर भरणा करीत असताना नगरपंचायतीकडून मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विस्तारलेल्या भागात नागरिकांना राहण्यासाठी अगोदर बोअर घ्यावे लागत आहे. पावसाळ्यात रस्ते, नाल्या नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून मोजक्या भागात रस्ते, नाल्या व पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. त्यामुळे विस्तारलेल्या भागाचा विकास कधी करणार ? व मांजरा धरणाचे पाणी पाईप लाईनद्वारे कधी येणार ? असा सवाल संतापलेल्या नागरिकांतून उपस्थित केला जात आहे .

बोअरमुळे जमिनीची चाळणी ; नगरपंचायतच्याच असंख्य बोअरवेल

केज शहराच्या विस्तारित भागात पाणी पुरवठ्यासाठी नळ योजना नाही. त्यामुळे या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांना घर बांधकाम सुरू करण्यापूर्वी बोअर घ्यावे लागते. त्यामुळे विस्तारलेल्या भागातील बहुतांश नागरिक बोअर घेऊन पाण्याची सोय करीत आहेत. तर केज नगरपंचायतच्याच असंख्य बोअरवेल असुन देखील बोअर घेण्याचा धडाका सुरूच आहे. त्यामुळे विस्तारलेल्या भागात बोअरच्या संख्या वाढीने जमिनीची चाळणी होत आहे. याकडे गांभिर्यने लक्ष देणे गरजेचे आहे.

कालबाह्य पाईपलाईनमुळे पाण्याचा अपव्यय, दूषित पाणी  

शहरातील अनेक प्रभागातील पाईप लाईन ही कालबाह्य झाली आहे. फुटलेल्या पाईप लाईनमुळे पाण्याचा अपव्यय होत असून त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शिवाय अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!