वादळवार्ता वार्तांकन – शाकेर शेख
बीड जिल्हा क्रीडा विभागामार्फत बीड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बीड तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन बीड येथील सैनिक विद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल नेकनुर या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा नुकत्याच पार पडल्या, यास्पर्धामधून न्यु.व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धासाठी निवड झाली आहे .
या संदर्भात अधिक माहिती अशी की, बीड क्रीडा विभागामार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी बीड तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल नेकनूर या शाळेचे 4×100 मीटर रिले या क्रिडा स्पर्धा प्रकारांमध्ये सय्यद अरायका, शिंदे सिध्दी, शेख अमिना, मोठे श्रेया तर 100 मीटर धावणे या क्रिडा स्पर्धा प्रकारामध्ये शिंदे सिद्धी या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थाअध्यक्ष रमेश भाऊ पोकळे, संस्था सचिव प्रा. गणेश पोकळे, शाळेच्या प्राचार्य सौ. स्वातीताई पोकळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक कृष्णा उगलमुगले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.