देश

जिद्द , चिकाटी , आभ्यासातील सातत्यामुळे कोचिंग न करता , पुस्तकांच्या जिवावर गुगलचा आधार घेत गरिमाने यूपीएससीत देशात दुसरी येण्याचा मिळवला सन्मान

वादळवार्ता

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर केला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. देशातल्या पहिल्या चारही क्रमांकांवर मुलीचंच वर्चस्व दिसून आलं. देशातल्या पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुलं आहेत. संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इशिताची देशभर चर्चा आहेच. त्यासोबत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या गरिमा लोहिया हिचंदेखील कौतुक होत आहे. विशेष म्हणजे गरिमाने कोणत्याही खासगी क्लासेसला न जाता घरीच परिक्षेची तयारी केली आणि देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

आपला पाल्य यूपीएससी ही नागरी सेवा परिक्षा उत्तीर्ण व्हावा म्हणून अनेक पालक मुलांच्या खासगी क्लासेसवर लाखो रुपये खर्च करतात. परंतु गरिमा लोहियाने घरीच अभ्यास करून ती या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. टीव्ही ९ भारतवर्षशी बोलताना गरिमा म्हणाली की, मी काहीतरी करून दाखवण्याचा निर्धार केला होता. आपल्या वाटेत कितीही अडथळे आले तरी थांबायचं नाही असं मी ठरवलं होतं.

गरिमाने सांगितलं की, तिने ही परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ पुस्तकांची मदत घेतली. तसेच ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती त्यासाठी तिने गूगलची मदत घेतली. तिला पहिल्याचं प्रयत्नात या परिक्षेत उत्तीर्ण व्हायचं होतं. परंतु पहिल्या प्रयत्नात ती अपयशी ठरली. तरीदेखील तिने दुसऱ्यांदा प्रयत्न करायचं ठरवलं. दुसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली. दोन्ही परिक्षांच्या वेळी तिला स्वतःवर विश्वास होता की, ती उत्तीर्ण होईल. परंतु पहिल्यांदा परिक्षा दिली तेव्हा ती काही गुणांनी मागे पडली. त्यावेळी ती थोडी निराश झाली होती. परंतु तिच्या आईने तिचा आत्मविश्वास वाढवला.

गरिमा म्हणाली, “मी स्वतःला खूप नशीबवान मानते. याआधी इतकी आनंदी कधीच झाले नव्हते. मी माझ्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय याचा खूप आनंद आहे. माझ्या मुलीने अधिकारी व्हावं असं माझ्या आई-वडिलांचं स्वप्न होतं. त्यांचं मागणं देवाने ऐकलंय. आज माझे बाबा असते तर खूप आनंदी झाले असते.” गरिमाच्या वडिलांचं २०१५ साली निधन झालं आहे.

गरिमाने बक्सरमधून तिचं १० वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. परंतु उच्च शिक्षण मिळवणं ही तिची सर्वात मोठी अडचण होती. कारण बक्सर हे खूपच छोटं शहर आहे. तिथे चांगल्या शाळा आणि महाविद्यालयांचा आभाव आहे. त्यामुळे इंटरचं शिक्षण घेण्यासाठी गरिमाच्या आई-वडिलांनी तिला वाराणसीला पाठवलं. १२ वीनंतर ती दिल्लीला गेली. तिथल्या किरोडीमल महाविद्यालयातून तिने बीकॉमपर्यंतचं शिक्षण घेतलं.

गरिमा म्हणाली, तिचे आई-वडील हे तिचे प्रेरणास्त्रोत आहेत. गरिमा जिथली रहिवासी आहे, त्या भागात मुलींचं १० वीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर त्यांचं लग्न लावून दिलं जातं. परंतु गरिमाचे आई वडील त्याविरोधात होते. उलट तिच्या पालकांनी तिला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. त्यामुळेच आज ती एवढं मोठं यश मिळवू शकली.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!