वादळवार्ता – केज
सहकार, शिक्षण आणि समाजकारणात तीन दशकांपासून हुकूमत गाजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून बाबुराव आडसकर यांची ओळख होती. १९६५ मध्ये केज पंचायत समितीचे सभापती म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. ग्रामीण बोलीभाषा पेहराव असे रांगडे व्यक्तिमत्त्व जनतेलाही भावले. त्या काळी स्व. केशरकाकू क्षीरसागर, सुंदरराव सोळंके, शिवाजीराव पंडित यांचा बीडच्या राजकारणात विशेष प्रभाव होता. अशा वेळी कुठलीही मोठी संस्था ताब्यात नसतानाही राजकीय वारसा नसताना सामान्य शेतकरी कुटुंबातील आडसकर यांनी बीड, चौसाळा, केज, परळी, रेणापूर,अंबाजोगाई धारूर तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. सेवा सहकारी सोसायटीपासून बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सूतगिरण्यांवर आडसकरांनी वर्चस्व निर्माण केले.अभ्यासू नेते कै. खासदार बापूसाहेब काळदाते यांचा पराभव करून बाबूराव आडसकर यांनी केज विधानसभेत १९७२ ते १९७७ या काळात आमदार म्हणून कार्याचा ठसा उमटवला. त्यानंतर सलग १२ वर्षे आडसकर लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार म्हणून विधान परिषदेत गेले. राज्य सहकारी बँकेवर सलग २५ वर्षे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले तर २५ वर्षे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताब्यात ठेवली. अंबाजोगाई साखर कारखान्यावर दीर्घकाळ त्यांची सत्ता राहिली.
शरद पवारांचे विश्वासू : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून आडसकर ओळखले जात. वसंतदादा पाटील सरकार अल्पमतात आल्यानंतर शरद पवार प्रथम मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा त्यांना बीड जिल्ह्यातील सातही आमदारांनी पाठिंबा दिला होता. या आमदारांचे नेतृत्व आडसकर यांच्याकडे होते. आज त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेशराव आडसकर, नातू ऋषिकेश आडसकर हे त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. आडसकर हे नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे, राजकारण आणि समाजकारणाची अपडेट माहिती ठेवणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज्यातील राजकारणी त्यांची भेट घेण्यासाठी मुद्दामहून आडस येथे त्यांच्या निवासस्थानी जात असत. कापूस उत्पादक शेतकरीही त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडत. आज त्यांचा ७ वा स्मृतीदिन या सृतीदिना निमित्ताने आडस येथे पंचक्रोशीतील तथा त्यांच्या सहवासातील असंख्य कार्यकर्ते त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे येतात व त्यांच्या कार्य विचारांना अभिवादन करतात.
प्रा. पवन सरवदे
श्री. छत्रपती शिवाजी उच्च माध्यामिक विद्यालय आडस
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!