दैनिक वादळ वार्ता /गौतम बचुटे
केज तालुक्यातील औरंगपुर येथे असलेल्या पावनधाम येथे तुकाराम बीज निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षण समर्थक आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करून त्यांचा ताफा अडविल्या प्रकरणी सुमारे ५० ते ५५ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, दि. २७ मार्च रोजी दुपारी १:३० वा. च्या सुमारास भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाजोगाई-कळंब रोडवर असलेल्या औरंगपूर येथील पावनधाम येथे तुकारामबिज निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्या नंतर त्या शेजारच्या सभा मंडपात मठाधिपती ह.भ.प. महादेव महाराज बोराडे यांचे सूरु असलेले कीर्तन ऐकण्यासाठी जात असताना मराठा आरक्षण समर्थक जमावातील कार्यकर्त्यानी त्यांना काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा आशा घोषणा दिल्या. त्यामुळे तेथे काही काळ गोंधळाची व तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यावर सौम्य लाठीमार केला होता. त्या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गोपनीय शाखेचे पोलीस शिपाई योगेश समुद्रे यांच्या फिर्यादी वरून ५० ते ५५ जणांच्या जमावांनी मा. जिल्हा दंडाधिकारी यांच्या महाराष्ट्र पोलिस कायदा जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून पंकजा मुंडे यांचे गाडीचे समोर येऊन त्यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीचे संदर्भाने एक मराठा; लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच ! अशा घोषणा दिल्या होत्या. जमावाने जिल्हा दंडाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन त्यांच्या विरुध्द गु र नं ७२/२०२४ भा दं वि ३४१, ३४३, १४७, १४९, १८८ महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार रामधन डोईफोडे हे तपास करीत आहेत.