जुनी विहीर नवीन दाखवून परस्पर पैसे उचलले; त्याची चौकशी होणार की नाही ?
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
मनरेगाच्या बाबतीत केज तालुक्यात वैक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीचे अनेक नमुने पहायला मिळत असून विहीर चोरीच्या घटना देखील चित्रपटातल्या सारख्या पहायला मिळत आहेत.

केज तालुक्यातील एका शेतकऱ्याने दहा वर्षांपूर्वी खोदलेली विहीर गाव पुढारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून नवीन असल्याचे दाखवून शेतकरी आणि मजूर यांच्या परस्पर जिल्हा बँकेत त्यांचे खाते उघडून परस्पर उचलून अपहार केला असल्याची प्रकार उघडकीस आला आहे. या गैरप्रकाराची शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील शेतकरी विठ्ठल पटणे यांना सन २०११-१२ मध्ये त्यांच्या शेत जमीन सर्व्हे नंबर ३४/१ मध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाली. सन २०१४ मध्ये त्यांनी मजुरा मार्फत विहिरीचे खोदकाम सुरू केले आणि सन २०१५ मध्ये विहिरीचे पूर्ण खोदकाम पूर्ण झाले. या कामाचे त्यांना मजुरीपोटी मजुरांना १६ हजार ६२६ रु. मिळाले. नंतर त्यानी मजुरराकरवी ३० फूट व्यास व ४१ फूट खोलीच्या विहिरीचे खोदकाम पूर्ण केले. परंतु त्यांनी बिलाची मागणी करूनही तांत्रिक अडचणीमुळे व पूर्णत्वाचे प्रमाणपत्र अपलोड केल्यामुळे बिल निघायला अडचणी आल्या. त्यांनी अनेक वेळा या बाबत वरिष्ठ कार्यालय आणि मंत्रालयातही पाठपुरावा सुरू ठेवला; परंतु त्यात यश आले नाही. तसेच पंचायत समिती आणि जिल्हा नरेगा कक्षानेही सदर कामे अपूर्ण ऑनगोइंग मध्ये दाखवून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कार्यवाही केली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून शेतकरी विठ्ठल पटणे यांनी स्वतः मजुरांचे पैसे दिले आणि त्याचा नाद सोडून दिला.
दरम्यान सन २०१६ मध्ये त्याच शेतकऱ्याच्या नावे पूर्वीची विहीर अस्तित्त्वात असतानाही नवीन वर्क कोड काढून २ लाख ७३ हजार ९०३ रु. हे मजुरांच्या खात्यावर वर्ग करून ते परस्पर उचलले असल्याची तक्रार विठ्ठल पटणे यांनी केली आहे. तसेच सदर विहिरीचे बांधकाम देखील केलेले नसतांना बांधकामासाठी खडी, सिमेंट, पाणी उपसा आणि क्रेन यासाठी १ लाख ३५ हजार ७३५ रु. हे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, शाखा अभियंता व अधिकाऱ्यांनी संगनमत करून उचलून अपहार केल्याची तक्रार विठ्ठल पटणे यांनी केली आहे. आता या प्रकरणी आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
________________________
“माझ्या शेतातील दुसरी विहीर कोणी चोरली ?”
“माझ्या शेतात एकच विहीर असताना दुसरी विहीर जर कागदोपत्री खोदली असेल तर ती विहिर मला शोधून द्यावी. नाही तर ती कोणी चोरली ? याचा तपास लावावा.”
विठ्ठल पटणे, शेतकरी
________________________
” या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी सुनावणी घेण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्या नंतर कारवाई करण्यात येईल.”
– गवते,
तक्रार निवारण अधिकारी, मनरेगा बीड
________________________
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!