वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
सध्या पावसाळ्याचे दिवस चालु असुन वाहन चालकांनी काळजी घेण्याची वेळ आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केज तालुक्यातील आडस येथे सकाळी शेतातून दुध आणण्यासाठी एकजण स्कुटीवर जात असताना घरापासून काही अंतरावर गेल्यावर अचानक हेडलाईट पासून एक साप बाहेर आला ,परंतु न घाबरता दुचाकीस्वाराने गाडी थांबवली व सापास बाहेर काढले. हा घोणस जातीचा विषारी साप असल्याचे सांगितले जात असून, मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.ही घटना शुक्रवारी दिनांक ८ जुलै सकाळी आडस ता. केज येथे घडली आहे. दुचाकी तपासूनच बाहेर निघावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून, पाऊस पडल्याने जमिनीतील छिद्रे बंद झाली आहेत.त्यामुळे साप बाहेर निघत आहेत. ते जागा मिळेल तिथे आपलं मुक्काम ठोकत आहेत. याचा प्रत्यय आडस येथील घटनेवरून दिसुन येत आहे. आडस येथील पुरुषोत्तम तागड यांची स्कुटी क्रमांक एम.एच. १२ एल आर ७७७९ ही रात्री घराबाहेर उभी होती. शुक्रवारी सकाळी तागड यांच्याकडे चालक म्हणून काम करत असलेले अभिषेक लाखे हे स्कुटी वर दूध काढण्यासाठी शेतात चालले होते. यावेळी ते घरापासून उप बाजार समिती जवळ आले असता स्कुटीच्या हेडलाईट पासून एक साप बाहेर आलेला दिसला.
साप पहाताच ते घाबरले परंतु प्रसंगावधान राखून स्कुटी उभी केली.जवळच असलेल्या वॉशिंग सेंटरवरील काहींना मदतीसाठी हाक दिली. त्यांनी येऊन त्या सापाला बाहेर काढले असता तो महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या चार विषारी सांपापैकी एक असलेला घोणस असल्याचं सांगितलं जात आहे. विषारी असल्याने त्यास काहींनी मारुन टाकले.
लक्ष गेलं नसतं अथवा घाबरून दुचाकी वरून पडले असते व पुन्हा चवताळून सापाने चावा घेतला असता तर? या विचाराने मनाचा थरकाप उडाला.वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.तर दुचाकी चालकांनी सकाळी दुचाकी बाहेर काढताना लक्षपुर्वक पाहायला हवे नंतरच दुचाकी बाहेर काढावी असे आवाहन करण्यात येत आहे.दुचाकी चालकांनी आपली वाहने अडगळीच्या ठिकाणी उभी करु नयेत. आपली काळजी घेणे गरजेचे आहे.